SFAC HOME

 

   राज्यातील शेतक-यांना शेतीशी निगडीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये सिंचन व्यवस्थेचा अभाव, अल्प जमिनधारणा, मोठया प्रमाणावरील हलक्या प्रतीची जमिन, कमी उत्पादकता ही कारणे आहेत. हे लक्षात घेता राज्य शासनाने पर्यायी पिक पध्दती, सुक्ष्म सिंचन, कृषि प्रक्रिया व पणन हे कृषि धोरणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणून स्विकारलेले आहे. आणि त्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. तसेच जागतिक व्यापार करारानंतर प्रत्येक स्तरावर शेती व्यापारक्षम करणे अपरिहार्य झालेले आहे.
      राज्यातील सुमारे १ कोटी शेतक-यांपैकी ७० टक्के शेतकरी लघु व सिमांतक आहेत. या शेतक-यांना नविन तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रवृत्त करण्याचे मोठे आवाहन कृषि विभागापुढे आहे. यास्तव शासनाने अनेक नविन उपक्रम सुरु करण्याचे ठरविले आहे. यामध्ये केंद्र शासनात ज्याप्रमाणे छोटया शेतक-यांसाठी लघु कृषि व्यापार संघ स्थापन केलेला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यात देखील शासन निर्णय क्रमांक SFAC-2003/CR-91/14-A दिनांक १६ मार्च, २००५ अन्वये महाराष्ट्र राज्य छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघाची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर संघाची नोंदणी सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट १८६० मधील तरतुदीनुसार करण्यात आलेली असून प्रधान सचिव (कृषि) हे कृषि व्यापार संघाचेअध्यक्ष आहेत. कृषि व्यापार संघाचे पूर्ण वेळ कामकाज पहाण्यासाठी व्यवस्थापकीय संचालकांची नियुक्ती करण्यात आलेली असून संघाचे कार्यालय कृषि भवन, शिवाजी नगर, पुणे येथे स्थापन करण्यात आलेले आहे.